– सुकवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत; सलगच्या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल
हंसराज, भंडारा :- निसर्गाच्या लहरीपणाचा आणि संकटांच्या मालिकेचा सामना करणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे. ‘अकवान’ चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यातील हवामानावर जाणवत असून, काल सायंकाळपासून सुरू
झालेल्या रिमझिम ते हलक्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेले भातपीक भिजले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती बळीराजाला सतावत आहे.
पावसापासून कापलेले धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र रिमझिम सरींमुळे अनेक ठिकाणी धान भिजले आहे. आता हे ओले झालेले धान वाचवण्यासाठी आणि ते पुन्हा सुकवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत व मेहनत घ्यावी लागत आहे. धान भिजल्यामुळे त्याच्या दर्जावर आणि एकूण उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदाचे वर्ष भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच ‘अलनिनो’च्या प्रभावामुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातून सावरून कसाबसा भातपिकाचा घास पदरात पडेल, अशी आशा असतानाच किडींच्या प्रादुर्भावाने शेकडो हेक्टरवरील पीक फस्त केले. त्यातच आता या अवकाळी रिमझिम पावसाने तडाखा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे.





