नागपूर :- हलबा समाज महासंघ, दीनदयाल नगर, नागपूर यांच्या वतीने प्रतिवर्षीच्या परंपरेनुसार यंदाही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांसाठी निःशुल्क सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा शनिवारी २० जून रोजी सायंकाळी ७ वाजता हलबा समाज सांस्कृतिक भवन, दीनदयाल नगर येथे उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या सामूहिक विवाह सोहळ्यात समाजातील अनेक वधू-वरांचा विवाह वैदिक पद्धतीने आणि पारंपरिक रीतीरिवाजांनुसार पार पडला. समाजात साधेपणा, समानता, परस्पर सहकार्य आणि सामाजिक सलोखा वाढीस लागावा हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटी नागपूरचे अध्यक्ष प्रफुल गुडधे- पाटील, हिंगणघाटचे माजी आमदार धनराज कुंभारे, माजी आमदार विकास कुंभारे, धनंजय धापोडकर, शरद सोनकुसरे, गजानन कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी नवविवाहित जोडप्यांना शुभाशीर्वाद देत हलबा समाज महासंघाच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. तसेच हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

या सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी हलबा समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.देवराम नंदनवार, महासचिव डॉ. रमेश पराते, सामूहिक विवाह समितीचे प्रमुख पुरुषोत्तम कोहाडकर, सहप्रमुख चंद्रकांत वैद्य तसेच विश्वनाथ धकाते, हरीश वरूडकर, वामन खोपकर, अशोक निमजे, रघुनंदन पराते, मनोज हेडाऊ, लक्ष्मण मोहाडीकर, मंगलमूर्ती सोनकुसरे, सुधाकर कुंभारे, योगेश गोंनाडे, देवेंद्र बोकडे, रवी पराते, परमानंद पराते, शांतराम पौनीकर, विनायक पराते, प्रकाश पाठराबे, अनिल नंदनवार, श्रीकृष्ण निपाणे, बालाजी गाठीबांधे, सौ. संध्या पराते यांच्यासह सामूहिक विवाह समितीच्या सर्व सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी हलबा समाज महासंघाच्या वतीने सर्व मान्यवर, समाजबांधव आणि स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले. भविष्यातही अशा सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. ही माहिती हलबा समाज महासंघाचे सल्लागार अनिल नंदनवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.




