spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अपलोना गोटुल, रामटेक येथे बारावी उत्तीर्ण आदिवासी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न

नागपूर :- अपलोना गोंडवाना बहुउद्देशीय विकास संस्था, नागपूर यांच्या वतीने रामटेक तालुक्यातील पवनी- देवलापार आदिवासी बहुल क्षेत्रातील शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या सत्काराचा भव्य सोहळा अपलोना गोटुल, पवनी येथे उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा गोंडवाना संस्कृतीचे जागते समाजप्रबोधक राजे वासुदेवशहा टेकाम होते. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक व एनटीपीएसचे कार्यकारी संचालक डॉ.टी.एस.भाल, बँक ऑफ इंडियाचे माजी चीफ जनरल मॅनेजर अर्जुन धुगत, निवृत्त प्राध्यापिका प्रा. सुमिता टेकाम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके तसेच मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. केशव वाळके उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन विजय कोकोडे यांनी केले तर संस्थेचे सचिव चंदनसिंग उईके यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या उद्दिष्टांची व ‘अपलोना गोटुल’ प्रकल्पाच्या कार्याची माहिती दिली. गोंडी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शिक्षण हेच यशाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. डॉ. टी.एस.भाल यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर उच्च शिक्षण घेऊन समाजात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले. अर्जुन धुगत यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला दिला. डॉ. केशव वाळके यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले, तर प्रा. सुमिता टेकाम यांनी शिक्षणासोबतच संस्कृती व सामाजिक मूल्यांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात राजे वासुदेवशहा टेकाम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास धरणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी देवलापार- पवनी परिसरातील सुमारे १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, भारतीय संविधानाची प्रत आणि गोंड शासकांच्या गौरवशाली इतिहासावरील पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व आश्रमशाळांच्या अधिकाऱ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच वन विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन हरीचंद्र सरियम यांनी केले. हा सोहळा आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणारा आणि समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक संदेश देणारा ठरला.

Popular Articles