spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“भक्तीचा महापूर! गणेशपुरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; सन्मित्र मंडळाच्या ५० व्या वर्षाचा मंगलमय प्रारंभ!”

हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथील प्रसिद्ध ‘सन्मित्र गणेश उत्सव मंडळा’ने आपल्या ५० व्या वर्षात पदार्पण केले असून, या सुवर्णमहोत्सवी वर्षाची मंगलमय सुरुवात भव्य बल्ली पूजा व भूमिपूजन सोहळ्याने करण्यात आली. २९ जून २०२६ रोजी गणेश चौक, गणेशपूर येथे हा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच, मागील वर्षी मंडळाला प्राप्त झालेल्या मानाच्या पुरस्कारांचेही विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर, आकर्षक फुलांनी सजवलेल्या ‘बल्ली’चे पूजन आणि श्रींच्या आगमनासाठी तयार करण्यात आलेल्या रथाचे पूजन करून आगामी उत्सवाचा आणि सुवर्ण पर्वाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.

हा सोहळा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व मंडळाचे अध्यक्ष राजकुमार प्रभुकुमार मेश्राम आणि मार्गदर्शक कमलेश मेहर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

यावेळी संस्थापक सदस्य रुपेश टांगले, गुलाब साठवणे, विजय मेहर, संजय भांडारकर, मनोज साठवणे, लक्ष्मण बारापात्रे, रूपेश मेश्राम, सावन बावणे, प्रशांत मते, प्रमोद पटले, अविनाश थोटे यांच्यासह मंडळाच्या १५० हून अधिक समर्पित कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

या मंगलमय प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, पंचायत समिती सदस्य कीर्ति गणवीर, सरपंच विद्या मेहर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, आशा सेविका, गुरुदेव सेवा मंडळ तसेच भंडारा नगरपरिषदेचे सदस्य व गावातील मान्यवर उपस्थित होते. सुमारे २०० ते २५० गणेशभक्तांच्या उपस्थितीने हा परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. ५० वर्षांची अखंड परंपरा, समाजसेवेचा वसा आणि संस्कारांचा वारसा जपत सन्मित्र गणेश उत्सव मंडळ यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात साजरे करणार आहे. उपस्थित सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

Popular Articles