spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोया कृषी कुंभ कृषी महोत्सवात भव्य खरेदीदार व विक्रेता संमेलन आयोजन

– जिल्ह्यातील जवळपास 20 ते 22 कंपन्यांनी व शेतकरी गटांनी उत्स्फूर्तपणे सहभाग 

गडचिरोली :- प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना (PMDDKY), प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना (PMFME) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत भव्य खरेदीदार व विक्रेता संमेलनाला शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यातील मध्यस्थ दूर होऊन थेट व्यापार प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने गडचिरोली येथील कोया कृषी कुंभ कृषी महोत्सवात भव्य खरेदीदार व विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनात जिल्ह्यातील जवळपास 20 ते 22 कंपन्यांनी व शेतकरी गटांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या संमेलनात शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच शेतकरी बचत गटांशी 10 करार करण्यात आले. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग अशी ओळख पुसत, गडचिरोलीचा शेतकरी आता थेट राज्यातील व्यापाऱ्यांशी संवाद साधत असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले. गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.अविशांत पांडा हे या संमेलनाला उपस्थित होते. खरेदीदारांना पाहिजे ते मिळावे तसेच विक्रेत्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी हे संमेलन आयोजित केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि व्यापाऱ्यांना उच्च दर्जाचा माल उपलब्ध करून देणे हा असल्याचे मत प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांनी केले. तांदूळ, विविध डाळी, कडधान्य, मोहफूल, चारोळी, मका, मसाले, हळद या कृषी उत्पादनाचे प्रामुख्याने करार करण्यात आले. तसेच या संमेलनात कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन व विपणन या विषयावर चर्चा करण्यात आली. राईस मिलर गडचिरोली, कृषिकोन्नती आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी,वरोरा, कांचणी फार्मर प्रोडूसर कंपनी, वरोरा, झेष्टीवाल लिमिटेड पुणे,ओज बहूउद्देशीय संस्था वरोरा यांसारख्या कंपन्यांनी थेट गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. महोत्सवात केवळ प्रदर्शनावर भर न देता, प्रत्यक्ष व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी क्रांतीमध्ये हे संमेलन एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. केवळ स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांनी मोठा नफा कसा मिळवावा, यावर येथे भर देण्यात आला.या संमेलनामुळे ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ (FPC) संकल्पनेला बळ मिळाले आहे. वैयक्तिक शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्यांचा समूह जेव्हा व्यापाऱ्यांशी बोलतो, तेव्हा त्यांना चांगला दर मिळतो.तसेच कृषि मालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले. या उपक्रमामुळे कृषी महोत्सवाचे स्वरूप केवळ करमणूक न राहता ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या प्रगतीचे साधन ठरत आहे.

Popular Articles