spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

द फोक आख्यान मधून दिल्लीत महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा भव्य जागर!

– महाराष्ट्राच्या लोककला आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादाने रसिक मंत्रमुग्ध

– कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली :- महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा, लोककलांचा आणि सांस्कृतिक वैभवाचा परिचय राजधानी दिल्लीतील रसिकांना करून देणारा ‘द फोक आख्यान’ हा सांस्कृतिक कार्यक्रम भारत मंडपम येथील खुल्या रंगमंचावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

नवी दिल्लीत ४५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याच्या (IITF) निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

‘थाट ह्यो जुना, खेळ हा नवा’ ही संकल्पना घेऊन साकारलेल्या ‘द फोक आख्यान’मध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा आधुनिक सादरीकरणातून वेध घेण्यात आला. गण, गवळण, भारूड, अभंग, पोवाडा, लावणी, ओवी आणि गोंधळ अशा विविध लोककलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील वैविध्य प्रभावीपणे उलगडण्यात आले.

संतपरंपरा, पंढरपूरची वारी, विठ्ठलभक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन या सादरीकरणातून घडले. ढोलकी, पखवाज, संबळ, हलगी, खंजिरी, डिमडी, धनगरी ढोल, तारपा आणि पावरी यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालांनी कार्यक्रमात विशेष रंग भरला. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या या लोककलांना आधुनिक संगीत आणि नृत्यशैलीची जोड देत सादर करण्यात आल्याने कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले. कलाकारांच्या ऊर्जावान सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक कलाप्रकाराला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.

महाराष्ट्रात लोकप्रियता मिळविलेल्या या कार्यक्रमाने दिल्लीतील रसिकांनाही आपल्या सादरीकरणाने आकर्षित केले. विशेष म्हणजे, कार्यक्रमाला केवळ मराठी बांधवांचाच नव्हे, तर इतर नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोककलेला भाषेच्या सीमा नसतात, याचा प्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील ऊर्जा, परंपरा आणि कलात्मकतेची ओळख उपस्थितांना या कार्यक्रमातून झाली.

या कार्यक्रमाची संकल्पना हर्ष राऊत आणि विजय कापसे यांची असून, गीतलेखन ईश्वर अंधारे यांनी केले आहे. संगीत संयोजनाची जबाबदारी हर्ष राऊत आणि विजय कापसे यांनी सांभाळली, तर निर्मिती रणजित गुगळे आणि भूषण मेहेरे यांची आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांना समकालीन सादरीकरणाची जोड देत त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.

महाराष्ट्राच्या लोककलेचा समृद्ध ठेवा राजधानी दिल्लीतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘द फोक आख्यान हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा परिचय करून देतानाच लोककलेच्या माध्यमातून विविध स्तरांतील रसिकांना जोडण्याचे काम या कार्यक्रमाने केले. त्यामुळे भारत मंडपममधील हा सांस्कृतिक सोहळा महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा राजधानीतील एक अविस्मरणीय जागर ठरला.महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या संगीता वराडे, महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे यांच्यासह दिल्लीस्थित मराठी बांधव आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles