किशोर साहू, मौदा :- बंधूप्रेमाचा सण मानला जाणारा ‘रक्षाबंधन’ हा सण जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा भोवरी येथे एका अनोख्या आणि पर्यावरणपूरक मार्गाने साजरा करण्यात आला. यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी माणसांऐवजी परिसरातील वृक्षांना राखी बांधून, त्यांच्या रक्षणाची पर्यावरणपूरक शपथ घेतली.
“वर्षानुवर्षे कोणतेही मोल न मागता झाडे आपल्याला सावली, फळे, फुले आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्राणवायू (ऑक्सिजन) देतात. खऱ्या अर्थाने निसर्गच आपला सर्वात मोठा रक्षक आहे,” या भावनेतून शाळेच्या मुख्याध्यापिका पठाण तबसून यांनी या संकल्पनेचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या नैसर्गिक व सुती धाग्यांच्या राख्या शाळेच्या प्रांगणातील तसेच गावातील झाडांना प्रेमाने बांधल्या. “जसे हे वृक्ष वर्षानुवर्षे आमचे रक्षण करत आले आहेत, तसेच आम्ही आयुष्यभर या वृक्षांचे जतन, संवर्धन आणि रक्षण करू,” अशी सामूहिक शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भोवरी गावातील ग्रामस्थ, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. मानवी नात्यांसोबतच निसर्गाशी घट्ट नाते जोडणारा हा उपक्रम समाजाला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक नवा संदेश देऊन गेला आहे.





