– मुख्य सचिव यांच्याकडून विविध विकास कामाची पाहणी
सचिन चौरसिया, रामटेक :- तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांनी शुक्रवार (दि.५ ) जून रोजी रामटेक नगरपरिषद क्षेत्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन स्थळांना भेटी देऊन तसेच दौऱ्यादरम्यान त्यांनी सुरू असलेल्या प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुख्य सचिव यांच्या हस्ते वनविभागाच्या नर्सरी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर त्यांनी ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या श्री क्षेत्र अंबाळा तलाव येथे भेट देत अंबाळा तलावाचे पुरातत्त्वीय व धार्मिक महत्त्व समजून घेत, त पायाभूत सुविधांच्या आराखड्याबाबत त्यांनी माहिती घेतली. भारतीय पुरातत्व विभागामार्फत (एएसआय ) संरक्षित असलेल्या त्रिविक्रमा मंदिर स्मारकाची पाहणी, रामटेक गड मंदिरासाठी प्रस्तावित असलेल्या रोपवे सुविधेकरिता आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. गड मंदिर परिसराची पाहणी करताना त्यांनी पुरातत्त्वीय वास्तू आणि अवशेषांचे जतन करणे, भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती, पाणीपुरवठा व्यवस्था अधिक बळकटकरणे या बाबत योग्य सूचना दिल्या. दौऱ्याच्या पुढील टप्प्यात मुख्य सचिवांनी राज्य पुरातत्व विभागामार्फत रुद्र नरसिंह मंदिर येथे सुरू असलेल्या संवर्धन कामांची पाहणी केली. कालिदास स्मारक, वनविभागाचे अतिथी भवन, डियर पार्क आणि राखी तलाव या प्रमुख स्थळांना भेटी देत त्यांनी स्थळभेट पाहणी पूर्ण केली. दौऱ्याचा समारोप कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात झाला. निशिगंधा करपे यांनी रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत करावयाच्या कामांचे सादरीकरण केले. दौऱ्याप्रसंगी नागपूर विभागाच्या अपर विभागीय आयुक्त माधवी खोडे, उपवनसंरक्षक विनिता व्यास, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, तहसीलदार रमेश कोळपे, पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पराग ठमके, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक मयुरेश खडके, अप्पर तहसीलदार पुनम कदम, उपअभियंता किरण पोकळे, वनाधिकारी राहुल शिंदे, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







