– वन्यप्रेमीं कडुन हळहळ व्यक्त
कन्हान :- नागपुर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहरातुन एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबई-हावडा मुख्य रेल्वेमार्गावरील कन्हान रेल्वे स्थानकाजवळील तुकाराम नगर परिसरात भरधाव रेल्वेगाडीच्या धडकेत सहा हरणांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात असुन वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शनिवार (दि.१८) जुलै २०२६ ला पहाटे अंदाजे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास हरणांचा एक कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना भरधाव रेल्वेगाडीच्या धडकेत सापडला. या भीषण अपघातात सहा हरणांचा घटना स्थळीच मृत्यु झाला. मृत हरणांमध्ये पाच मादी व एक नर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच काही प्रत्यक्षदर्शींनी सामा जिक कार्यकर्ते यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर प्राणीमित्र व सर्पमित्र शेखर बोरकर तसेच नगरसेवक प्रशांत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे प्रशासन, वनविभाग आणि नगरपरिषदेला त्वरित घटनेची माहिती देण्यात आली.
“मुक्या जीवांचा बळी थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि वनविभागाने समन्वय साधुन संवेदन शील भागांमध्ये तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना राबवाव्यात,” अशी भावना वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे. मात्र सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत वनविभागा चे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर वन विभागाचे अधिकारी गोविंद लूचे, कन्हान सर्कलचे एसीएफ राहुल सोनवणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत मृत हरणांचे पंचनामा करून त्यांना वनविभागा च्या वाहनातुन पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले.
या घटनेमुळे कन्हान परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जंगल परिसरालगत असलेल्या रेल्वे मार्गांवर वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेऊन विशेष सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. रेल्वे मार्गांवर वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित मार्ग, वेग नियंत्रण तसेच संवेदनशील भागांमध्ये सतर्कता यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. निसर्गातील मुक्या जीवांचा अशा प्रकारे झालेला मृत्यु मन हेलावुन टाक णारा असुन वन्यप्राण्यांचे संवर्धन आणि संरक्षण ही केवळ वनविभागाची नव्हे तर सर्व संबंधित यंत्रणांची सामुहिक जबाबदारी असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. वन्यप्राण्यांच्या या दुर्दैवी मृत्युमुळे संपुर्ण कन्हान परिसरात हळहळ व्यक्त होत असुन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




