– नैसर्गिक संकटापासून संरक्षणासाठी प्रत्येक शेतकऱ्याने तातडीने पीकविमा काढावा : शैलेश जायसवाल
पंकज परशुरामकर,इनसाइडर न्युज टुडे
नवेगावबांध :- यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांची अक्षरशः परीक्षा सुरू केली आहे. जून महिन्यात दमदार पावसामुळे समाधान व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जुलै महिन्यातील पावसाच्या लपंडावाने पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यात काही भागांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी अर्जुनी मोरगाव तालुक्यासह अनेक ग्रामीण भागांत सलग अनेक दिवस पावसाचा खंड पडल्याने धान रोवणीसाठी तयार केलेली परे (धानाची रोपे) सुकण्याच्या मार्गावर पोहोचली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे ही परे पुन्हा सावरली असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही पावसाची अनिश्चितता कायम असल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता अद्यापही कमी झालेली नाही.
बदलत्या हवामानामुळे शेती दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत असून, काही दिवसांचा पावसाचा खंड किंवा अचानक होणारी अतिवृष्टी संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त करण्यास पुरेशी ठरत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याने प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेऊन आपल्या कष्टाच्या भांडवलाचे संरक्षण करावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गोंदिया जिल्हाप्रमुख शैलेश जायसवाल यांनी केले आहे.
ते म्हणाले की, आजचा शेतकरी बियाणे, खते, औषधे, मशागत, रोवणी, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च करीत आहे. अनेकजण बँका, पतसंस्था किंवा खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेती करतात. मात्र निसर्गाच्या एका फटक्यात वर्षभराची मेहनत आणि गुंतवणूक पाण्यात जाते. अशा संकटसमयी शेतकऱ्याला आर्थिक आधार देणारे सर्वात प्रभावी साधन म्हणजे प्रधानमंत्री पीकविमा योजना आहे.
यंदा हवामानातील सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे अनेक भागांत रोवणी उशिरा झाली असून काही ठिकाणी दुबार रोवणीची वेळही आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीत पीकविमा हा पर्याय नसून काळाची गरज बनला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जायसवाल यांनी सांगितले की, शासनाने पीकविमा अर्जासाठी मुदत निश्चित केली असली, तरी अनेक शेतकरी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज करण्याचे टाळतात. अंतिम क्षणी सर्व्हर डाऊन होणे, इंटरनेटची अडचण, कागदपत्रांतील त्रुटी किंवा तांत्रिक कारणांमुळे अनेक पात्र शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता अंतिम मुदतीपूर्वीच अर्ज सादर करून पीकविमा काढावा, असे त्यांनी आवाहन केले.
यासोबतच कृषी विभाग, महसूल प्रशासन, ग्रामपंचायती, कृषी सहाय्यक आणि संबंधित यंत्रणांनी गावागावांत विशेष जनजागृती मोहीम राबवून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पीकविमा योजनेची माहिती पोहोचवावी, अशी मागणीही त्यांनी केली. प्रत्येक गावात विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करून अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, जेणेकरून एकही शेतकरी माहितीअभावी किंवा तांत्रिक अडचणीमुळे योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी शेतकऱ्यांना भावनिक साद घालत शैलेश जायसवाल म्हणाले, “निसर्गाच्या लहरीपणावर कोणाचेही नियंत्रण नाही; मात्र आपल्या घामाने आणि कष्टाने उभ्या केलेल्या पिकाचे आर्थिक संरक्षण करणे आपल्या हातात आहे. पीकविमा हा खर्च नसून संकटाच्या काळात शेतकऱ्याला उभारी देणारे आर्थिक कवच आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने विलंब न करता प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी व्हावे.”
‘पीकविमा म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाला आर्थिक कवच’
“बदलत्या हवामानामुळे शेती करणे दिवसेंदिवस अधिक जोखमीचे होत आहे. अतिवृष्टी, पावसाचा खंड किंवा नैसर्गिक आपत्ती कधीही येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत तातडीने सहभागी व्हावे. हा खर्च नसून शेतकऱ्याच्या भविष्याची आर्थिक हमी आहे.”
— शैलेश जायसवाल
जिल्हाप्रमुख, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)




