कामठीतील रमानगर उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून संतापाचा भडका; सरकारी अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याची चर्चा
कामठी १० : नवीन कामठी परिसरातील रमानगर उड्डाणपुलाचे उद्घाटन होण्याआधीच पुलावर मोठे भगदाड पडल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल आणि परिसरातील शैक्षणिक संस्थांशी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलावर बुधवारी (९ जुलै) सकाळी ही घटना घडली. तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर उघडकीस आलेल्या या भगदाडाने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
नागरिकांमध्ये चर्चा : “अजून किती गड्ढे पडणार?”
या प्रकारानंतर परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे की “हा एकच भगदाड आहे की अजून किती गड्ढे या पुलावर पडणार आहेत?” अनेकांनी संशय व्यक्त केला की सरकारी अधिकाऱ्यांची ठेकेदारासोबत मिलीभगत असून भ्रष्टाचारामुळे हे निकृष्ट काम झाले आहे?.
“फक्त ठेकेदार नाही, अधिकारीही जबाबदार!”
स्थानिक नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे की, “फक्त ठेकेदारच नव्हे, तर कामावर देखरेख करणारे अभियंते आणि प्रशासकीय यंत्रणा देखील तितकेच जबाबदार आहेत.” त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे यामागे आर्थिक व्यवहार आणि साठगांठ असल्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.
“लोकांच्या जिवाशी खेळ” संतप्त प्रतिक्रिया
रोज हजारो नागरिक आणि विद्यार्थी या पुलावरून प्रवास करणार होते. जर उद्घाटनाआधीच अशी परिस्थिती असेल, तर वापरात आल्यावर काय होईल? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. “हे अपयशी काम नव्हे, तर गुन्हा आहे. प्रशासनाचे तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचले असले तरी अद्याप कोणतेही ठोस किंवा अधिकृत वक्तव्य दिले गेलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात आता हे प्रकरण पुन्हा गारद करून जबाबदारांना वाचवण्याचा डाव रचला जातोय का, अशी तीव्र शंका निर्माण झाली आहे.




