spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्त्री ही केवळ घरची गृहीणी नसून ती समाजाच्या प्रगतीचा कणा आहे – ॲड. सुलेखा कुंभारे यांचे प्रतिपादन

– निर्धार’च्या व्यासपीठावरून २१ रणरागिणींचा गौरव

कामठी :- “स्त्री ही केवळ घरची गृहीणी नसून ती समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. महिलांनी केवळ पारंपरिक कार्यक्रमांत न अडकता कायद्याचे ज्ञान आत्मसात करून स्वतःच्या हक्कांसाठी ‘सबला’ बनावे,” असे ओजस्वी प्रतिपादन माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘निर्धार’ महिला व बालविकास समिती, नागपूर यांच्या वतीने आयोजित ‘निर्धार महिला पुरस्कार-२०२६’ वितरण सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला.

दिमाखदार उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूरच्या उपमहापौर लीला हाथीबेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना उपमहापौर म्हणाल्या की, “नागपूर शहर आता ‘स्त्री-शक्तीचे केंद्र’ म्हणून ओळखले जात आहे. प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर महिलांना सन्मानाची वागणूक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”

व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रेखा सपकाळ, प्रा. मालती साखरे, प्रा. नुसरत मिनु, डॉ. राजश्री मेश्राम, साहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांची विशेष उपस्थिती होती.

विविध क्षेत्रांतील २१ ‘रत्नांचा’ सन्मान

विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या २१ महिलांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.

सन्मानितांमध्ये :

शिक्षण: डॉ. राजश्री मेश्राम, सुनंदा वाघमारे.

सामाजिक: कविता डंभारे, रत्नमाला मेश्राम.

साहित्य: मालती साखरे, नुसरत मिनु.

राजकारण: कामठीच्या उपाध्यक्षा सबा तौसीफ खान, नगरसेविका कल्पना द्रोणकर, संगीता पाटील, भावना लोणारे, अर्पणा बागडे.

पत्रकारिता: रचना गजभिये, संगीता प्रिया पाठक.

प्रशासन व वैद्यकीय: एसीपी अनिता मोरे, शालिनी गेडाम, डॉ. शबनम.

क्रीडा व कला: दिशा कासट, रितीका हिवतोडे, अल्का राऊत, अपर्णा लखमापुरे.

उद्योग: संगीता अग्रवाल, आम्रपाली वासे.

‘निर्धार’चे सामाजिक ऋण

सीताबर्डी येथील मुख्य कार्यालयातून वर्षभर महिला सक्षमीकरण, बचत गट मार्गदर्शन, कायदेशीर सल्ला आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ‘निर्धार’ समिती समाजपरिवर्तनाचे कार्य करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समितीचे पदाधिकारी नंदा गोडघाटे, जया पानतावने, रत्नामाला मेश्राम, अहिल्या रंगारी, रजनी लिंगायत, सुकेशीनी मुरारकर, रत्ना मेंढे, माया कांबळे, सरीता पाटील, सावला सिंघाड़े, रेखा भावे, लिला आंबुलकर, अनमोल डोंगरे, छाया गाडघे, रूख्मा वासनिक इत्यादी समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नागपूर आणि परिसरातील महिलांची विक्रमी उपस्थिती लाभली होती.

Popular Articles