spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आसमान फाऊंडेशनतर्फे कन्यापूजनासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप

– गावागावांतून खेळाडू निर्माण व्हावेत, हेच उद्दिष्ट; डॉ. रवि गिऱ्हे यांचे प्रतिपादन

नागपूर :- नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आसमान फाऊंडेशन, नागपूर यांच्या वतीने बोथली ठाणा येथील माध्यमिक शाळेत कन्यापूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. धार्मिक परंपरेचे जतन करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि क्रीडा विकासाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आला. नवरात्रात कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. याच परंपरेचे पालन करत आसमान फाऊंडेशनच्या वतीने कन्यापूजनाचे आयोजन करण्यात आले. फाऊंडेशनच्या डॉ. साधना थोते, मेघा गिऱ्हे तसेच शाळेतील महिला शिक्षिकांनी कन्यापूजनाचे विधी पूर्ण केले. या उपक्रमातून मुलींचा सन्मान, स्त्रीशक्तीचा गौरव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवि गिऱ्हे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना स्टेशनरी साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून आपले कौशल्य विकसित करता यावे, यासाठी शाळेला स्पोर्टस् अर्थात क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.

गावागावांतून उत्तम खेळाडू निर्माण व्हावेत: डॉ.रवि गिऱ्हे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात मोठी क्षमता असते. मात्र, अनेकदा आवश्यक साहित्य आणि योग्य संधींच्या अभावामुळे त्यांना आपल्या कौशल्याला वाव देता येत नाही. विद्यार्थ्यांना योग्य सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातूनही उत्कृष्ट खेळाडू घडू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य देणे गरजेचे आहे. गावागावांतून उत्तम खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशाने आसमान फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रतिपादन गिऱ्हे यांनी केले. शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक जाणीव यांचा संगम साधणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचे ठरतात. गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना विविध क्षेत्रांत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.

याप्रसंगी नरेश शेंडे, दिनेश टेकाडे, शाळेचे मुख्याध्यापक सुनील टेकाडे तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता. विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक योगदान:

आसमान फाऊंडेशनच्या या उपक्रमातून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित झाली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Popular Articles