– धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आरोग्य शिबिरांमध्ये १६,५७५ रुग्णांची तपासणी
नागपूर :- ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरात भाविक, नागरिक व अनुयायांसाठी व्यापक आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून एकूण १६,५७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. नागरिकांना आवश्यक आरोग्य तपासणी, वैद्यकीय सेवा आणि उपचारांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे अण्णाभाऊ साठे चौक, बजाज नगर, काचीपुरा आणि कृपलानी चौक या चार ठिकाणी दिनांक १८ ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत २४ तास सुरू असलेल्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. उपलब्ध अहवालानुसार या चार केंद्रांवर एकूण ६,८२४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी नागपूर महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील (UPHC) व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांतील (UHWC) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
शिबिरांमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करून उच्च रक्तदाबासारख्या आजारांची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार रुग्णांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (GMC) संदर्भित करण्यात आले. तसेच नागरिकांसाठी एक्स-रे तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोनच्या अहवालानुसार एकूण २० रुग्णांना पुढील उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे संदर्भित करण्यात आले, ४७ एक्स-रे तपासण्या करण्यात आल्या, तर १,२४० रुग्णांची उच्च रक्तदाब (HTN) तपासणी करण्यात आली.
याशिवाय, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित व्यापक आरोग्य शिबिरांच्या एकत्रित सारांशानुसार दीक्षाभूमी परिसरातील डोम, राज्य शासनाच्या वतीने माता कचेरी, उपसंचालक कार्यालय परिसर तसेच विविध आरोग्य शिबिरांमध्ये मिळून एकूण ९,७५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, ७ रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले. या एकत्रित अहवालानुसार दीक्षाभूमी येथील आरोग्य शिबिरात २,९४१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवेच्या १० रुग्णवाहिका तसेच नागपूर महानगरपालिकेच्या ४ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गरजू रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली.
महापौर निता ठाकरे यांनी शिबिराला भेट देत पाहणी केली होती. हे आरोग्य शिबिर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकित, मुरुगनंथम एम. मिलिंद मेश्राम आणि आरोग्य सेवा, मंडळ कार्यालय, नागपूरचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. तसेच नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये श्री. अविनाश गावंडे आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण,सर्वोपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा परिषद नागपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, यांच्या देखरेखीखाली शिबिराचे कामकाज पार पडले.
लक्ष्मीनगर झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांच्या देखरेखीखाली, डागा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. प्रवीण नवखरे यांच्या समन्वयातून तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे (NUHM) शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका दिपाली नागरे यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रतिनियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाची कामगिरी बजावली.
या उपक्रमात खाजगी दवाखाने, विविध सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनीही (NGO) आरोग्य शिबिरे आयोजित करून रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. विविध शासकीय यंत्रणा, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.
या शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोनमधील अधिकारी, एन यू एच एम अधिकारी अश्विनी वाचनिक प्रतीक मोटघरे चेचना भगत रोहित तंडाले यांच्या सह इतर कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. भाविकांना आणि नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकांनी समन्वयाने काम केले.
या आरोग्य शिबिरांमुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा, आजारांचे वेळीच निदान आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळाले. सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे येणाऱ्या भाविकांना व नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.







