spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या आस्था दहीकरचा खाप्यात भव्य सत्कार! मंडई महोत्सवात गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा व्यापारी बांधवांकडून गौरव

खापा, वार्ताहर :- दिवाळीनिमित्त नवमीच्या दिवशी बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी खापा शहरातील बाजार चौक येथील बँक ऑफ बडोदा समोरील प्रांगणात भव्य मंडईचे आयोजन करण्यात आले होते. या पारंपरिक मंडई महोत्सवाचे औचित्य साधून खापा शहरातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसह क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी शहरातील व्यापारी बांधवांच्या वतीने गुणवंतांचा गौरव करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.

या समारंभातील विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे लॅक्रॉस या आंतरराष्ट्रीय खेळात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी खाप्याची कन्या आस्था स्वाती प्रशांत दहीकर. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षक म्हणून खेळताना संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे खापा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या यशाचा गौरव करत शहरातील व्यापारी बांधवांनी तिचा भव्य सत्कार केला.

लॅक्रॉस हा उत्तर अमेरिकेतील प्राचीन सांघिक खेळ असून बाराव्या शतकापासून या खेळाची परंपरा आहे. कॅनडाचा राष्ट्रीय उन्हाळी खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळात जाळीदार काठीच्या साहाय्याने चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टमध्ये टाकून गुण मिळवले जातात. हा वेगवान आणि कौशल्यपूर्ण खेळ असून आस्थाने या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश खाप्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

“गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव”

राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालयातील बारावी कला शाखेतून प्रथम क्रमांक मिळविणारी विद्यार्थिनी पायल भानुदास कोहाळ, वाणिज्य शाखेतून प्रथम आलेला विद्यार्थी श्लोक सुभाष धकाते तसेच दहावीच्या बोर्ड परीक्षेत शाळेतून प्रथम आलेला विद्यार्थी वैभव मोरेश्वर बळवाईक यांचा सत्कार करण्यात आला.

जिजामाता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी कला शाखेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी कांचन मनोहर बिसरे तसेच दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी उत्कर्षा सचिंद्र लांजेवार यांचाही गौरव करण्यात आला.

जवाहर हायस्कूल व कनिष्ठ कला-विज्ञान महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी कीर्ती नरेंद्र हांडे, कला शाखेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी ऐश्वर्या उमेश खरवडे तसेच दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी सांज दुर्गाप्रसाद बीहोणे यांचा शहरातील व्यापारी बांधवांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेले यश आणि आस्था दहीकर हिने क्रीडा क्षेत्रात केलेली आंतरराष्ट्रीय कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. गुणवंतांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा उपक्रम समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.

यावेळी छगन कवडे, कैलास कापसे, मकसूद शेख, गोपाल कोल्हे, रविंद्र कवडे, बाल्या भुसारी, सचिन तुमाने, प्रमोद चकोले, तेजराम गाडीगोने, अशोक दंदे, मृणाल हरडे, आकाश लखपती, कपिल देशमुख, विजय येणुरकर यांच्यासह शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Popular Articles