यवतमाळ :- गडचिरोली येथे दि.१५नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस महोत्सवात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद अंतर्गत येणाऱ्या परोटी वन (ता. उमरखेड) गावातील भिल्ल नायकडा बाजा नृत्य पथकाने पारंपरिक नृत्य आणि ऐतिहासिक कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील या कलाकारांनी राज्यपातळीवर मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे पुसद प्रकल्प कार्यालयासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. याबाबत विकास मीना जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी
१६ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय वनजागर कार्यक्रमात पथकाचे कौतुक करुन सन्मान केला.भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृती, लोककला, रूढी-परंपरा आणि वारसा यांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने आदिवासी विकास विभागामार्फत गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिवस या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत महाराष्ट्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या सर्वोत्कृष्ट नृत्य पथकांनी सहभाग नोंदवला होता. सहभागी सर्व नृत्य पथक यांची राज्य स्तरीय गुणांकन समितीने निकषानुसार प्रथम जिल्हा निहाय पथक निवडुन पुन्हा विभाग निहाय आणि अंतिम फेरीत २४ नृत्य पथक सहभागी होते. यापैकी गुणांकन समितीने प्रथम, व्दितीय व तृतीय असा क्रम अंतिम करून २ नृत्य पथकाना प्रोत्सहान पर निवड केली. अशाप्रमाणे गुणांकन समितीने घेतलेल्या सर्व फेऱ्यामध्ये पुसद प्रकल्पाच्या या नृत्य पथकाने अंतिम फेरीत राज्यस्तरावर रु.२,००,००० चा प्रथम पुरस्कार मा. जुएल ओराम केंद्रीय मंत्री, जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार व डॉ. अशोक वुईके, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य व निलेश सागर आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या हस्ते स्विकारला.
या यशासाठी प्रकल्प कार्यालयाने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत पारंपारिक नृत्य करण्याऱ्या कला पथक / ढेमसा नृत्य साहित्य खरेदीकरिता अर्थसहाय्य करणे ही योजना घेऊन कार्यक्षेत्रातील १५ नृत्य पथकांना रु.५०,००० प्रत्येकी थेट अनुदान हस्तांतरण करुन पारंपारिक वेशभूषा, वाद्य खरेदी करण्याकरिता अर्थसहाय्य करुन प्रोत्साहन दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून परोटी वन (ता. उमरखेड) गावातील भिल्ल नायकडा बाजा नृत्य पथकातील कलाकारांची जिद्द, अथक परिश्रम आणि प्रकल्प कार्यालयाचे योग्य नियोजन व मार्गदर्शन मोलाचे ठरले.
ग्रामीण भागातील आदिवासी तरुणांमध्ये प्रचंड कलागुण दडलेले असून त्यांना योग्य प्रोत्साहन मिळाल्यास ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही आपली मोहोर उमटवू शकतात, हे परोठी वनच्या कलाकारांनी सिद्ध केले आहे. त्यांचे हे यश प्रकल्प क्षेत्रातील इतर नवोदित कलाकारांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना अमोल मेतकर प्रकल्प अधिकारी यांनी व्यक्त केल्या आहेत.






