यवतमाळ :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट नयनतारा’ अंतर्गत जिल्ह्यात तिरळेपणामुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत आज यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे बाह्यरुग्ण विभागात जिल्हास्तरीय मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत आज, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे बाह्यरुग्ण विभागात (OPD) तिरळेपणा तपासणी शिबिर होणार आहे. तपासणीनंतर पात्र रुग्णांवर 21 व 22 नोव्हेंबर रोजी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हे शिबीर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य राज्य समन्वयक रितेश पाटील, विभागीय समन्वयक अभिजित पाटील यांच्या समन्वयातून राबविण्यात येत आहे.
या शिबिराचा लाभ लहान मुले, तरुण-तरुणी तसेच सर्व वयोगटांतील तिरळेपणाचा त्रास असलेल्या नागरिकांना घेता येणार आहे. विशेषतः 18 ते 25 वयोगटातील लग्न इच्छुक तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक प्रसाद बनसोड यांनी केले आहे.





