spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रोहित पठारे हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करा!

– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे जुन्या वादातून झालेल्या रोहित पठारे हत्याकांडातील सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात रोहित पठारे यांची अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींनी रोहित यांना घरातून ओढत बाहेर आणले, त्यांचे पाय बांधून चौकाचौकांत बेदम मारहाण केली. तसेच स्क्रू ड्रायव्हरने पायावर वार करून त्यांना गंभीर यातना दिल्या. या अमानुष घटनेमुळे अनुसूचित जाती समाजासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एवढी गंभीर आणि क्रूर घटना घडूनही सरकार मौन का बाळगून आहे, असा सवालही प्रतिनिधींनी उपस्थित केला. या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव राजेश रंगारी यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल पातोळे, वरिष्ठ महासचिव दिनेश वाघमारे, महासचिव प्रफुल्ल भाजे, सचिव रत्नदीप रंगारी, सचिव गुणवंत सोनटक्के, सचिव कपिल दामोदर, सचिव सम्मी करोसिया, माजी नगरसेवक मनोज सांगोळे, राजीव अंबादे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles