कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयस्तंभ चौक परिसरात हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित क्षेत्रात वावरत असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख सलमान उर्फ अब्बू वल्द शेख हुसेन (वय 28) असून तो चित्तरंजन नगर, बाबा अब्दुल्लाहशाह दर्गाहजवळ, कामठी येथील रहिवासी आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्तांच्या आदेशान्वये 22 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 56 अंतर्गत शेख सलमान याला नागपूर शहर पोलीस आयुक्तालय तसेच नागपूर ग्रामीण हद्दीतील पारशिवणी, खापा, सावनेर, कळमेश्वर, कन्हान, मौदा, कुही आदी पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातून रामटेक येथे हद्दपार करण्यात आले होते.
मात्र, हद्दपारीचा आदेश लागू असतानाही तो जयस्तंभ चौक, कामठी येथील प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.








