१२.६१ लाखांचा महसूल गेला बुडून; चौकशी अहवालावरून निलंबनाची कारवाई
सावनेर ९ – प्रशासकीय कामकाजात गैरवर्तन आणि दस्तनोंदणी प्रक्रियेत शासनाच्या महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी सावनेर येथील दुय्यम निबंधक संजना एस. जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी केली.
जाधव यांच्या कार्यकाळातील जुलै ते डिसेंबर २०२४ दरम्यान झालेल्या दस्तनोंदणी व्यवहारांची चौकशी करण्यात आली. चौकशी समितीच्या अहवालानुसार सात दस्तऐवजांत मुद्रांक शुल्क ११ लाख ७५ हजार ९६१ रुपये व नोंदणी शुल्क ८५ हजार ३१० रुपये, असा एकूण १२ लाख ६१ हजार २७१ रुपयांचा महसूल शासनाला बुडाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
स्थानिक आमदार आशिष देशमुख, माजी आमदार सुधाकर कोहळे व नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २८ ऑगस्ट रोजी सावनेर दुय्यम निबंधक कार्यालयाची अचानक पाहणी केली होती. यावेळी कार्यालयात केवळ एक कंत्राटी कर्मचारी हजर असून खासगी व्यक्तीकडून कामकाज चालविले जात असल्याचे आढळले. यावर बावनकुळे यांनी संताप व्यक्त करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते.
यानंतर नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी स्वतः सावनेर येथे भेट देऊन तक्रारकर्त्यांचे जबाब नोंदवले. नोंदणी उपमहानिरीक्षक साहेबराव दुनोडे व मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे यांच्या उपस्थितीत अनेकांनी तोंडी व लिखित स्वरूपात तक्रारी सादर केल्या.
या सर्व चौकशी अहवालाच्या आधारे नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) अभयसिंह मोहिते यांच्या स्वाक्षरीने दुय्यम निबंधक संजना जाधव यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला आहे.




