· येवला चिचोंडी औद्योगिक वसाहतीत सुखजीत स्टार्च कंपनीचा मका प्रक्रिया उद्योग उभारला जाणार
मुंबई :- नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत मोठा मका प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. सुखजीत स्टार्च कंपनीमार्फत चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या प्रकल्पासाठी चिचोंडी औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १२५ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
सुखजित स्टार्च लि. यांचा उद्योग लवकर सुरू होण्यासाठी उद्योग विभाग आणि संबंधित कंपनीने सामंजस्य करार करून पुढील कार्यवाही तातडीने करावी, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दररोज १,२०० टन, तर दुसऱ्या टप्प्यात दररोज २,४०० टन मक्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. दरवर्षी सुमारे ३ लाख ५० हजार मेट्रिक टन मक्यावर प्रक्रिया होणार आहे. नाशिक जिल्ह्यात मका हे प्रमुख पीक असून, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील मका उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच मक्यावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणारा हा उद्योग शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे दरवर्षी तब्बल ३ लाख ५० हजार मेट्रिक टन मक्याची मागणी निर्माण होणार असल्याने येवला आणि परिसरातील सुमारे ५० हजार मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊन, मका पिकाला स्थानिक पातळीवरच मोठी मागणी निर्माण होईल. परिणामी मका उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात १००० हून अधिक थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर वाहतूक, साठवणूक, कृषी सेवा, देखभाल, लॉजिस्टिक्स आणि इतर पूरक व्यवसायांमधून अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील औद्योगिक विकासाला आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.
यावेळी प्रकल्पाच्या सुरळीत उभारणी व कार्यान्वयनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पासाठी स्वतंत्र फिडरद्वारे ६ मेगावॅट वीजपुरवठा तसेच नांदूर मधमेश्वर धरणातून दररोज ५० लाख लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे संबंधित विभागांना जलदगतीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन, पाणी, वीज तसेच अन्य पायाभूत सुविधांची पूर्तता वेळेत व्हावी यासाठी उद्योग, जलसंपदा, एमआयडीसी, महावितरण तसेच संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.या मेगा प्रोजेक्टसाठी पुरवल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी ६० टक्के पाणी पुनर्प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मका पिकावर आधारित या मोठ्या मूल्यवर्धन उद्योगाला आवश्यक त्या अतिरिक्त सवलती व प्रोत्साहनांचा लाभ मिळावा यासाठी या प्रकल्पाचा ‘मेगा प्रोजेक्ट’मध्ये समावेश केला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला आवश्यक असलेल्या विविध शासकीय सवलती आणि सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
“शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्थानिक पातळीवरच मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, मका पिकाचे मूल्यवर्धन करणे आणि येवला तालुक्यात उद्योग व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी आणि हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा,” असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले. या प्रकल्पामुळे येवला तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासोबतच ‘शेतमालापासून उद्योग आणि उद्योगातून रोजगार’ अशी विकासाची साखळी निर्माण होणार असून, येवला औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
बैठकीला आमदार पंकज भुजबळ, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अनबळगन, जलसंपदा विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उद्योग विभागाचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब यशवंते, उद्योग उपसचिव आबासाहेब कवळे, नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कल्पेश लहिवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार, नाशिक एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.
त्याचप्रमाणे व्हिसीद्वारे माजी खासदार समीर भुजबळ, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्र कुशवाह, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आदी उपस्थित होते.





