– एमडी ड्रग्ज विक्रेत्यावर धडक छापा, एक अटक, एक फरार
कामठी :– अवैध मादक पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत जुनी कामठी पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत एमडी ड्रग्ज विक्रेत्याला रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३ लाख ४७ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली तर एक फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल कलीम शेख (वय ४४) यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरून, दि. १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता नागपूर–कामठी रोडवरील महिंद्रा उन्नती शोरूमजवळील आऊटर रिंगरोडच्या पुलाखाली सापळा रचण्यात आला. या वेळी दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीची झडती घेण्यात आली असता, त्याच्या ताब्यातून खालीलप्रमाणे एमडी ड्रग्ज आणि अन्य साहित्य मिळून आले.
यात
५५ ग्रॅम एमडी पावडर (किंमत २,७५,००० रु.)
मोबाईल फोन (किंमत १०, ०००रु.)
होंडा शाईन मोटारसायकल (किंमत ५०,००० रु.)
नगदी ११,०६०रु.
वजनकाटे, झिपलॉक पिशव्या आणि बॅग इत्यादी
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ३,४७,५७० रु. एवढी आहे.
या प्रकरणात अटक आरोपीचे नाव नवनित सुरेश शेवाने (वय २८, रा. आराधना नगर, बिडगाव) असे असून, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्याला एमडी पावडरचा पुरवठा करणारा ‘गोलु’ नावाचा इसम सध्या फरार आहे.
सदर आरोपींनी मिळून मेफेडोन (एमडी) ड्रग्ज अवैधरित्या विक्रीसाठी ठेवून एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धाडसी कारवाईत पीएसआय आकाश महल्ले, पीएसआय मिलिंद मेश्रेम, पीएसआय सागर भंडारी, प्रॉ. पीएसआय अक्षय सावंत, हेडकॉन्स्टेबल अब्दुल कलीम, अभय मून आणि पीसी प्रविण यांनी सहभाग घेतला.
जुनी कामठी पोलिसांच्या या यशस्वी कारवाईने एमडी विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरु केला असून, पुढील तपास सुरु आहे.




