– आरोपी फरार; चिखली गावातील तलावाकाठी कारवाई
प्रतिनिधी / हंसराज, भंडारा अड्याळ :- अड्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिखली येथे पोलिसांनी धाड टाकून अवैध हातभट्टी दारू तयार करण्याचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ६४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी पोलिसांना पाहून फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बाभरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजा चिखली येथील गाव तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टी सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिखली गाव तलावावर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी रामकृष्ण बिलवणे (वय २२ वर्षे, रा. चिखली, ता. पवनी) हा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलिसांनी घटनास्थळाची पंचासमक्ष पाहणी केली असता, तेथे प्रत्येकी २०० किलो क्षमतेचे ४ निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम आढळले. त्यात एकूण ८०० किलो सडवा मोहापास (किंमत १,६०,०००/- रुपये), ४ हजार रुपये किमतीचे ४ प्लास्टिक ड्रम आणि १०० रुपये किमतीचे ४ लोखंडी डबे, असा एकूण १ लाख ६४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक १३५/२०२४, कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि सपोनि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाभरे व त्यांच्या पथकाने केली आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास अड्याळ पोलीस करीत आहेत.








