spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्र्यांच्या दखलीनंतर वनमजुरांचे थकीत वेतन जमा; बारा दिवसांचे उपोषण मागे

– दिवाळीपूर्वी वेतन मिळाल्याने वनमजुरांना दिलासा

गडचिरोली :– थकीत वेतनाच्या मागणीसाठी आलापल्ली येथे गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेले वनमजुरांचे उपोषण आज मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाची दखल घेतल्यानंतर वनविभागाने प्रलंबित वेतन वनमजुरांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले. दिवाळीपूर्वी वेतन मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

आलापल्ली परिसरातील वनमजुरांनी प्रलंबित वेतन तातडीने मिळावे, या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. सणासुदीच्या काळातही वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या मागणीसाठी ते गेल्या बारा दिवसांपासून उपोषण करीत होते.

मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी वनमजुरांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या व अडचणी जाणून घेतल्या. वेतनाच्या प्रश्नाबाबत शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास श्री. पालकर यांनी दिला. तसेच वेतन अदा करण्याच्या कार्यवाहीची माहिती देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर वनविभागाने थकीत वेतनाची रक्कम संबंधित वनमजुरांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केली. रक्कम जमा झाल्याची खात्री झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडले.

दिवाळीपूर्वी थकीत वेतन मिळाल्याने वनमजुरांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Popular Articles