spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संभाव्य पूरस्थिती निवारणासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी

– मान्सूनपूर्व आढावा बैठकीत निर्देश; दुर्गम गावांमध्ये अन्न, औषध व इंधन साठा उपलब्ध ठेवण्यावर भर

 गडचिरोली :- येत्या मान्सून कालावधीत संभाव्य पूरस्थिती आणि आपत्तीजनक परिस्थितीचा विचार करून सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करत ठोस कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवणे, धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करणे तसेच दुर्गम भागांमध्ये अन्नधान्य व औषधसाठा पूर्वनियोजनातून उपलब्ध ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी गावंडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पूरप्रवण आणि संवेदनशील भागांची यादी तयार करून त्या भागांमध्ये विशेष सतर्कता ठेवण्यात यावी. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा यांसारख्या पूरप्रवण भागांमध्ये आवश्यक उपाययोजना आणि जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी. पूरस्थिती किंवा अन्य आपत्तीच्या काळात विभागीय समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याने प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या स्पष्ट करून तातडीने कृती करावी, असे त्यांनी नमूद केले.

गावपातळीवर स्थानिक तरुण, पोहोण्यात प्रशिक्षित स्वयंसेवक आणि बचाव कार्यात मदत करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दुर्गम आणि संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या गावांमध्ये पुढील चार महिन्यांसाठी अन्नधान्य, औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा व त्याची खात्री करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

नदीनाल्यांवरील छोटे पूल, रस्ते आणि नाले यांची दुरुस्ती व स्वच्छता पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देत वाहतूक बंद होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच ग्रामीण व शहरी रस्त्यांची सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे, तेथे पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागाने सर्पदंश, मलेरिया, मेंदूज्वर, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांवरील आवश्यक औषधसाठा सर्व सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध ठेवावा. दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी विहीर, हँडपंप आणि पाणवठ्यांची स्वच्छता करून पिण्याच्या पाण्याजवळ सांडपाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

आपत्ती निवारण कार्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी रुग्णवाहिका, बचाव बोटी तसेच मदत यंत्रणांसाठी आवश्यक डिझेल आणि पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

नदीकाठच्या गावांना संभाव्य धोक्याचा इशारा वेळेत देण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. पूराच्या काळात पुलावरून पाणी वाहत असताना वाहन चालवू नये तसेच परवानगीशिवाय नदीपात्रात बोट, होडी किंवा डोंगा घेऊन जाण्यास मनाई राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. गावोगावी स्वच्छता, आरोग्य आणि आपत्ती प्रतिबंधाबाबत बैठका घेऊन व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी पूरपरिस्थितीत उद्भवणारे संभाव्य धोके, संवेदनशील क्षेत्रे आणि विभागनिहाय करावयाच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.