किशोर साहू, मौदा, ता. १९ :- भेंडाळा गावात नुकतेच पी.आर.ए. (सहभागी ग्रामीण मूल्यांकन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकरी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, महिला गट व युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, नागपूर व कृषी संशोधन केंद्र, तारसा येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्य अनुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत भेंडाळा गट ग्रामपंचायतीला भेट दिली आणि गावाचा सामाजिक नकाशा तयार केला.
या नकाशामध्ये भेंडाळा गावातील सर्व महत्त्वाच्या भागांचे चित्रण करण्यात आले असून त्यामध्ये मंदिर, रेल्वे ट्रॅक, शाळा, पाण्याची टाकी, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन इत्यादी बाबी समाविष्ट करण्यात आल्या.
नकाशा तयार करताना गावातील पुरुष, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी सक्रिय सहभाग दर्शविला.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कृषी विद्यार्थिनी पुनम मानकर, प्राची लाडे, शुभांशी मानकर, शैलेजा मानवटकर, अश्लेषा मस्के, कृतिका महेशने सह इतर विद्यार्थिनींचे स्वागत करून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचा समारोप ग्रामीण नागरिक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन भविष्यासाठी कार्ययोजना तयार करण्याच्या संकल्पाने केला, जेणेकरून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलता येतील.




