Home Latest News अस्थिका समाजात अखंड विष्णुसहस्रनाम पारायण २९ सप्टेंबरला

अस्थिका समाजात अखंड विष्णुसहस्रनाम पारायण २९ सप्टेंबरला

0
7

– विविध संस्था व भाविकांचा सहभाग; सकाळी गणपती पूजनाने प्रारंभ, महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन

नागपूर :- विश्वा विष्णुसहस्रनाम संस्थान (VISVAS), चेन्नई, ग्रुप ऑफ श्री विष्णुसहस्रनाम सत्संग (GVSS), VISVAS नागपूर सत्संग व VISVAS ग्लोबल टीम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अस्थिका समाज, नागपूर यांच्या सहकार्याने मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी, अखंड विष्णुसहस्रनाम पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे धार्मिक आयोजन श्री भगवती सभागृह, गजानन महाराज मंदिरा समोर, त्रिमूर्ती नगर, नागपूर येथे होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता. गणपती पूजनाने होईल. त्यानंतर विविध संस्था व सत्संग मंडळांच्या सहभागातून अखंडपणे श्री विष्णुसहस्रनामाचे सामूहिक पठण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सांगता दुपारी १.३० वाजता मंगलारतीने होईल. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. VISVASचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.टी.जे. श्रीधरन हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपूर शहरातील विविध धार्मिक व सामाजिक संस्थांना या सामूहिक विष्णुसहस्रनाम पठणात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच भगवान महाविष्णूचे नामस्मरण करण्यासाठी शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. श्री विष्णुसहस्रनामाचे पठण हे कलियुगातील शांततेसाठी प्रभावी साधन आहे, अशी श्रद्धा आयोजकांनी व्यक्त केली आहे. श्री विष्णुसहस्रनामाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी VISVAS संस्था कार्यरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्ती, शिस्त, समर्पण, दृढनिश्चय, विकास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या मूल्यांचा संदेश देण्यात येणार आहे. भाविकांनी या आध्यात्मिक उपक्रमात सहभागी होऊन श्री महाविष्णूचे नामस्मरण व आशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन अस्थिका समाज, नागपूरचे सचिव के.व्ही.नागराजन यांनी केले आहे.