spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित लाभांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन आक्रमक

– ज्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा केली, त्यांना सन्मानाने त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे” – दिनेश बिल्लरवान

कामठी :- अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन, कामठी शाखेच्या वतीने सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य शशी सारवान होते. प्रारंभी संत कबीरदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

युनियनचे अध्यक्ष दिनेश बिल्लरवान यांनी मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांचा प्रश्न उपस्थित केला. “नगर परिषद कामठीतील अनेक कर्मचाऱ्यांनी ३० ते ३५ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र आजही अनेक कर्मचाऱ्यांना वैधानिक सेवानिवृत्ती लाभांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असे ते म्हणाले.

“ज्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा केली, त्यांना सन्मानाने त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे,” असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली.

युनियनतर्फे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवानिवृत्ती लाभ तातडीने अदा करावेत, लाभ वितरणासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी तसेच भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर आपल्या हक्कासाठी भटकावे लागू नये यासाठी कायमस्वरूपी प्रभावी व्यवस्था उभारावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

प्रशासनाशी सकारात्मक संवादातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू राहील. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल, असा इशाराही बिल्लरवान यांनी दिला.

युनियनचे पदाधिकारी लवकरच नगर परिषद कामठीचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बैठकीचे सूत्रसंचालन सचिव कैलास मलिक यांनी केले. यावेळी सुदर्शन समाजाचे चौधरी गेंदलाल कलसे, युनियनचे सल्लागार रूपलाल समुद्ररे, नरेश वासनिक, नरेश कलसे, महासचिव कृष्णा राणे, उपाध्यक्ष अमित मधुमटके, कोषाध्यक्ष शेखर बर्मन, प्रचारमंत्री पुरुषोत्तम समुद्ररे, शरद उज्जैनवार, राजू हाटे, रामेश्वरी बर्मन, सुशीला समुद्ररे तसेच युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी महासचिव कृष्णा राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Popular Articles