– गटविकास अधिकारीपदी पियुष डोंगरे रुजू; सहाय्यक गटविकास अधिकारीपदी पंकज लोखंडे यांनी स्वीकारला पदभार
कामठी :- कामठी पंचायत समितीच्या प्रशासनात नव्या नेतृत्वाची अधिकृत सुरुवात झाली असून कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी पियुष डोंगरे यांनी बुधवारी (१ जुलै) पदभार स्वीकारला. त्याचबरोबर कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पंकज लोखंडे यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदाची सूत्रे हाती घेतली. या नियुक्त्यांमुळे पंचायत समितीच्या विकासकामांना नवी दिशा आणि अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रशासकीय नियमानुसार तत्कालीन गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले आणि सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र उके हे ३० जून रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दीर्घ, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरव देत कामठी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करून निरोप देण्यात आला.
यानंतर रिक्त झालेल्या गटविकास अधिकारी पदावर पियुष डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली, तर सहाय्यक गटविकास अधिकारी पदाची धुरा पंकज लोखंडे यांच्याकडे सोपविण्यात आली. दोन्ही अधिकाऱ्यांनी १ जुलैपासून अधिकृतपणे पदभार स्वीकारत कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले यांनी दोन्ही नवनियुक्त अधिकाऱ्यांकडे पदभार सुपूर्द करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
कामठी तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता व गतिमानता आणि नागरिकाभिमुख सेवांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नव्या अधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या विकासकामांना नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.




