spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष पुनरीक्षण मोहिमेला प्रारंभ

– ३० जून ते २९ जुलैदरम्यान बीएलओ करणार घरभेटी; नागरिकांच्या सहकार्याचे प्रशासनाचे आवाहन

कामठी :- आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित मतदार यादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कामठी तालुक्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (एसएसआर-२०२६) सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदार यादीतील माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार गणेश जगदाळे व नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. बीएलओंकडून घरभेटीदरम्यान मागविण्यात येणारी आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यास मतदार यादीतील माहिती अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत होईल. यामुळे अपात्र, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळून नव्याने पात्र ठरलेल्या मतदारांचा समावेश करणे सुलभ होणार आहे.

प्रशासनाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी बीएलओंची नियुक्ती करण्यात आली असून, नियोजित वेळेत घरभेटी पूर्ण करून माहितीची पडताळणी करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

लोकशाहीची खरी ताकद अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादीत दडलेली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाळे व नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी केले आहे.

Popular Articles