– एकाच चॉकलेट फ्लेवरच्या दुधाचा पुरवठा
– पुरवठादाराची राज्यस्तरीय चौकशी करण्याची भीमशक्तीची मागणी
अमरावती :- सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहे आणि निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या टेट्रा पॅक दूध पुरवठ्यात अनियमितता असल्याचा आरोप भीमशक्ती संघटनेने केला आहे. दूध पुरवठ्यातील त्रुटी, साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि एकाच फ्लेवरच्या दुधाचा पुरवठा याबाबत संबंधित पुरवठादाराची राज्यस्तरीय समितीमार्फत चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
६५ हजार विद्यार्थ्यांसाठी नवा निर्णय
राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ४४९ शासकीय वसतिगृहे आणि ९२ निवासी आश्रमशाळा कार्यरत आहेत. या संस्थांची एकूण विद्यार्थी क्षमता ६५ हजार २६३ इतकी आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर साध्या दुधाचा पुरवठा केला जात होता. मात्र, ३१ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयानुसार १५ सप्टेंबरपासून प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज २०० मिली फ्लेवर मिल्क टेट्रा पॅक देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रति पॅक २६ रुपये ४० पैसे दर निश्चित करण्यात आला आहे. समाजकल्याण आयुक्तांच्या ९ सप्टेंबरच्या आदेशानंतरही अमरावती आणि नागपूर विभागात दूध पुरवठा नियमित होत नसल्याचा दावा भीमशक्ती संघटनेने केला आहे. अनेक वसतिगृहांमध्ये अद्याप नियमित पुरवठा सुरू नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
साठवणुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष?
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता दूध पुरवठ्याच्या गुणवत्तेबरोबरच त्याच्या साठवणुकीची योग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे. यासाठी पफ इन्सुलेटेड स्टोरेज बॉक्स, लाकडी स्टँड, थर्मल इन्सुलेशन शीट तसेच वाहतुकीसाठी स्वच्छ फूड-ग्रेड कंटेनर वापरण्याच्या अटी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मात्र, काही ठिकाणी दुधाचे बॉक्स थेट जमिनीवर ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एकाच फ्लेवरच्या दुधावर आक्षेप
विद्यार्थ्यांना केवळ चॉकलेट फ्लेवरचे साखरयुक्त दूध दिले जात असल्याबद्दलही संघटनेने आक्षेप घेतला आहे. बदाम, पिस्ता, केशर, वेलची आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या विविध फ्लेवर्सचा समावेश करण्याची गरज असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दररोज फ्लेवर मिल्क देण्याचा निर्णय कोणत्या अभ्यासाच्या आधारे घेण्यात आला, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
मंत्र्यांसह अधिकाऱ्यांना निवेदन
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष पंकज ललित मेश्राम यांनी केली आहे. यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, आमदार रोहित पवार, विभागाचे सचिव, समाजकल्याण आयुक्त तसेच अमरावती आणि नागपूर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत आतापर्यंत चॉकलेट फ्लेवरच्या दुधाचा पुरवठा सुरू होता. मात्र, सोमवारपासून नागपूर जिल्ह्यातही हा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. एकाच फ्लेवरचे दूध दिले जात असल्याची बाब खरी आहे. भीमशक्ती संघटनेचे निवेदन अद्याप प्राप्त झालेले नाही. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असे नागपूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी सांगितले.






