कामठी :- कामठी कॅन्टोन्मेंट परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक अपघातात वीज खांबावर काम करत असलेल्या विजतंत्रज्ञाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून तीन निष्पाप मुलांचे पितृछत्र कायमचे हरपले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मजहर अली मुजफ्फर हुसेन (वय ५६), रा. नया बाजार, अपना किराणा स्टोअरजवळ, कामठी हे ठेकेदारामार्फत विद्युत दुरुस्तीचे काम करत होते. रविवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास कॅन्टोन्मेंटमधील प्राथमिक शाळेमागील कमसरी बाजार परिसरात वीज खांबावर काम सुरू असताना अचानक त्यांना तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. जोरदार झटका बसल्याने ते थेट खांबावरून खाली कोसळले.
घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना उपचारासाठी आशा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
मजहर अली हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून त्यापैकी दोन मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उदरनिर्वाहाचा आधारच हिरावला गेला आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे घटनेची निष्पक्ष चौकशी करून मृताच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, योग्य नुकसानभरपाई तसेच मुलांच्या शिक्षण व संगोपनाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, अशी जोरदार मागणी केली आहे.





