खापा २६ :- खापा येथे लहू सेना, खापा यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात व भव्यदिव्य पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे तसेच इतर अनेक थोर समाजसुधारकांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला शेकडो लोकांची उपस्थिती लाभली होती. मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्य, शाहिरी व सामाजिक योगदानाचे स्मरण केले. यावेळी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत भावनिक ग्वाही दिली की “तुम्ही मला अर्ध्या रात्रीसुद्धा आवाज दिलात तरी आशिष देशमुख तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल.” अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत शिकले होते, मात्र त्यांच्या पोवाडे, शाहिरी, कथालेखन आणि विविध साहित्य प्रकारातील विपुल लेखनामुळे ते आज अजरामर झाले आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ते आंबेडकरवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. विषमतावाद आणि वर्णभेद मिटवून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी त्यांनी पोवाडे आणि शाहिरीच्या माध्यमातून लोकजागृती केली. यावेळी आमदार डॉ. देशमुख यांनी नगरपरिषद खापा येथील वाचनालयाला “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय” असे नाव देण्याचे आश्वासन दिले. तसेच मातंग समाजासाठी जागा उपलब्ध करून देऊन समाजभवन उभारण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाला भाजयुमो जिल्हाध्यक्ष पियुष बुरडे, खेमराज बारापात्रे, रवी खुबाळकर, किशोर बुरडे, देवाजी बोरकर, अमोल भुते, जीवन गायकवाड, डॉ. विनोदजी दाढे, किशोर भुजाडे, खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार, मुकेश गायधनी, रवी परतेकी, सतीश लांजेवार, राहुल निर्मल, जितेंद्र जरवेकर यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजयुमो जिल्हाध्यक्ष पियूष बुरडे, डॉ. विनोद दाढे, ललित सनेश्वर, अतुल सनेश्वर, शेखर साळवे, नरेश सनेश्वर, साहिल वाघमारे, अभिलाष सनेश्वर, उज्वल सनेश्वर आणि अतुल सनेश्वर आदींनी विशेष परिश्रम घेतले.



