खापा २६ :- महाराष्ट्रातील प्रमुख कृषी पर्व म्हणून भाद्रपद कृष्ण अमावस्येला साजरा केला जाणारा पोळ्याचा सण खापामध्ये मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावकऱ्यांच्या वतीने बाजार चौकात पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांसह गावातील सर्व नागरिकांनी पोळ्याच्या कार्यक्रमात मोठ्या उत्सुकतेने सहभाग घेतला. या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आंघोळ घालून, सुंदररित्या सजवून पारंपरिक वेषभूषेत कार्यक्रमात हजेरी लावली होती. सकाळपासूनच लोकांनी मुलांच्या खेळण्यासाठी मातीचे बैल विकत घेतले, तर घराघरांत विशेष पारंपरिक व्यंजनांची रेलचेल होती. नन्ह्या बालकांना पोळ्याच्या तोरणाखालून नेण्याची प्रथा पार पडली, तर संपूर्ण परिसर “हर हर महादेव” आणि “घेऊन जा गे मारबत” या घोषणांनी दुमदुमून गेला. खापा शहरातील पाटील राजेश शरद बन्सोड आणि प्रणव बन्सोड यांनी आपल्या बैलजोड्यांसह बँडबाजाच्या गजरात पोळ्यात सहभाग नोंदवला. भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर ग्रामीण (काटोल) जिल्हाध्यक्ष पियूष बुरडे यांच्या पुढाकाराने खापा शहरात प्रथमच भव्य आणि ऐतिहासिक अशा बैल पोळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोळ्यात सहभागी सर्व शेतकऱ्यांचा दुपट्टे व टोपी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, शेतकऱ्यांच्या पोशाख आणि बैलांच्या सजावटीसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. देवानंद बोकडे, नरेंद्र देशपांडे, सादिक बाघाडे, यशवंत ढोंगे पाटील यांच्यावतीने प्रोत्साहनपर बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक विजेता सुरेश गाडिगोणे यांना डबल बॅटरी फव्वारा, द्वितीय मयूर पावडे यांना सिंगल बॅटरी फव्वारा, तृतीय राजेश शरदराव बन्सोड यांना चार्जिंग लाईट, चतुर्थ दिलीप बावनकुळे यांना वॉटर कूलर, पंचम गुणेश्वर हिंगे यांना कॅल्शियमयुक्त स्टीलची दुधाची केतली, तर सहावा अनिल लांजेवार यांना प्लास्टिकची दुधाची केतली प्रदान करण्यात आली. तसेच दहा शेतकरी सतीश रोकडे, पंकज डवले, मनोहर बोंद्रे, मधुकर पारडकर, रमेश ढगे, राकेश भुजाडे, आकाश मारोतकर, अशोक धांदे, वसंता धांदे आणि कमलाकर रक्षक यांना स्टीलचे टिफिन बॉक्स व मोबाईल स्टँड देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजयुमो जिल्हाध्यक्ष पियूष बुरडे यांच्यासह पुंडलिक घाटोळे, बब्बूभाई शेख, रमेश बोंद्रे, नारायण लांबट, दिवाकर बोंद्रे, सतीश लांजेवार, राहुल निर्मल, सचिन बुरडे, अनिल हिंगे, आशीष निस्ताने, जितेंद्र जर्वेकर, मिलिंद बुरडे, बलराज सुरकार, मोहन लांबट तसेच माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खापा शहरातील पाटील कुटुंबाच्या बैलजोडीच्या आगमनानंतर पारंपरिक तोरण तोडून पोळ्याचा समारोप झाला. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची पूजा करून आनंदात पोळ्याचा समारोप केला.



