spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘सर्वांसाठी शेती’ धोरण जाहीर करा, अन्यथा भंडारा ते नागपूर ‘पायदळ लाँग मार्च’

– बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा एल्गार; १४ एप्रिलपर्यंतचा दिला अल्टीमेटम

हंसराज,प्रतिनिधी भंडारा तुमसर :- भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी जयंतीचे (१४ एप्रिल) औचित्य साधून शासनाने ‘सर्वांसाठी शेती’ हे धोरण घोषित करावे, अन्यथा भंडारा ते नागपूर असा भव्य ‘पायदळ लाँग मार्च’ काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते जगदीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भंडारा जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील भूमिहीन शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. ग्रामीण भागातील हजारो भूमिहीन शेतकरी वर्षानुवर्षांपासून सरकारी जमिनीवर (गायरान, ई-क्लास) कष्ट उपसून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, अद्यापही या जमिनी त्यांच्या नावे करण्यात आलेल्या नाहीत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून गोरगरीब भूमिहीनांना जमिनीचे मालकी हक्क मिळवून द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. शेतीची अतिक्रमणे नियमित करण्यासाठी शासनाने तात्काळ शासन निर्णय (GR) निर्गमित करावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

. प्रमुख मागण्या

🔹’सर्वांसाठी शेती’ हे क्रांतिकारी धोरण राज्यभर तातडीने लागू करावे.

🔹 सरकारी जमिनीवर (गायरान, ई-क्लास) शेती करणाऱ्या भूमिहीनांची अतिक्रमणे कायमस्वरूपी नियमित करून त्यांना ‘सातबारा’ उतारा देण्यात यावा.

🔹 या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी विशेष शासन निर्णय (GR) १४ एप्रिलपर्यंत प्रसिद्ध करावा.

“शासनाने १४ एप्रिलपर्यंत सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर हजारो शेतकऱ्यांसह भंडारा ते नागपूर असा पायदळ लाँग मार्च काढला जाईल,” असा निर्धार जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाम यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी मोठ्या संख्येने एकवटले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा संघटनेने घेतला आहे.

Popular Articles