नागपूर :- हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमून्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर व अमरावती विभागातील हातमाग विणकरांनी या स्पर्धेसाठी आपल्या प्रवेशिका व कापडाचे नमुने २० मार्च पर्यंत सादर करावे असे आवाहन वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त, अंजू बालपांडे यांनी केले आहे.
विभागीय हातमाग कापड स्पर्धा दिनांक २४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील विणकर बांधवांनी तयार केलेले कापड या स्पर्धेत ठेवण्यात येणार असून उत्कृष्ठ ठरलेल्या कापडांना पारितोषिक जाहिर करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली या हातमाग कापड स्पर्धा आयोजित करण्यात येईल. प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत क्र. २, आठवा माळा, ‘बी’ विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे होणार आहे. सर्व हातमाग कापड विणकरांनी याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाशी ०७१२-२५३७९२७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त, अंजू बालपांडे यांनी केले आहे.




