यवतमाळ, दि. २9 : सद्या पिकांवर किडीचा प्राथमिक स्वरुपाचा प्रादुर्भाव दिसण्याची शक्यता आहे. असा प्रादुर्भाव दिसताच अझाडायरेक्टीन १५०० पीपीएम या किटकनाशकाची ५० मिली मात्रा १० लिटर पाण्यात मिसळून सुरक्षित फवारणी करावी. फवारणी करत असतांना निरनिराळ्या रसायनांचे मिश्रण करुन फवारणी करणे टाळावे. रासायनिक किटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणुन करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
किडीने आर्थीक नुकसान पातळी ओलांडल्यास केंद्रीय किटकनाशाक मंडळ, फरीदाबादद्वारे शिफारशीत कोणत्याही एका किटकनाशकाची आवश्यकता भासल्यास १० ते १५ दिवसाच्या अंतराने सुरक्षित फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिन्थेटिक पायरेथ्रोइड गटातील किटकनाशकांचा वापर ऑक्टोबर महिन्यापूर्वी करणे टाळावे. रसशोषक किडीच्या व्यवस्थापनाकरीता पिवळ्या चिकट सापळयाचा वापर करावा.
मावा, तुडतुडे व फुलकिडे किडींनी आर्थीक नुकसान पातळी १० रस शोषक किडी प्रति पान किंवा २-३ तुडतुडे प्रति पान किंवा १० फुलकिडे प्रति पान किंवा १० मावा प्रति पान अशी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओलांडल्यास नियंत्रणासाठी व्हीसीलीयम लेकॅनी १.५ टक्के डब्ल्यू पी ५० ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्ल्यू जी. २ ग्रॅम किंवा फ्लोनिकॅमिड ५० डब्ल्यु जी. ३ ग्रॅम यापैकी कोणत्याही एक किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून सुरक्षित फवारणी करावी.
कपाशीवर केवळ मावा या किडींनी आर्थीक नुकसानींची संकेत पातळी गाठतांच १० मावा प्रति पान नियंत्रणासाठी ॲझाडिरॅक्टीन ०.०३,३०० पीपीएम टक्के ५० मिली किंवा थायोमथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू जी २ ग्रॅम तसेच तुडतुडे या किडींनी आर्थिक नुकसानीची संकेतपातळी गाठतांच २-३ तुडतुडे प्रति पान नियंत्रणासाठी अॅसीटामीप्रीड २० टक्के १ ग्रॅम किंवा अॅसीफेट ७५ टक्के दानेदार ८ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात घेवुन सुरक्षित फवारणी करावी.
प्राथमिक स्वरुपाचा किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्वरीत निंबोळी अर्क ५ टक्केची फवारणी करावी. सोयाबिन वरील खोडमाशी व चक्रभुंगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळल्यास किडीच्या प्रभावी नियंत्रणाकरीता इथिऑन ५० ईसी ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी ७ मिली किंवा क्लोरनट्रॅनिलीप्रोल १८.५ ईसी २.५ मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोयाबिन पिकावर हिरवी उंटअळी, तंबाखुची पाने खाणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आल्यास फ्लुबेडीअमाईड २० टक्के डब्ल्यु जी ६ ग्रॅम किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८ एससी ६ मिली किंवा फ्लुबेडींअमाईड ३९.३५ एससी ३ मिली किंवा यापैकी कोणत्याही एका किडनाशकाची फवारणी करावी.
सोयाबिन पिकावर पानातील बुरशीजन्य ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पायरोक्लोस्ट्रोबीन २० टक्के डब्ल्यु जी १० ग्रॅम किंवा टेबुकोनाझोल १० टक्के सल्फर ६५ टक्के डब्ल्यूजी २५ ग्रॅम १० लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकांची फवारणी करावी,
तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रोपीकोनाझोल २५ टक्के प्रवाही १० मिली किंवा हेक्झाकोनाझोल ५ टक्के प्रवाही १० मिली प्रति १० लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका रसायनांची सुरक्षित फवारणी करावी. फवारणी साठी पाण्याचा सामु ६ ते ७ ठेवावा, असे कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुखांनी कळविले आहे.




