– बहुजन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन व शैक्षणिक प्रगतीची संधी
मुंबई :- राज्यातील बहुजन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांची प्रशासकीय सेवांमध्ये अधिकाधिक निवड व्हावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या यशस्वी करिअरच्या वाटचालीत अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरने २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या मोफत ऑफलाईन प्रशिक्षण उपक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या उपक्रमाचा लाभ राज्यातील राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार असून गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, अभ्याससाहित्य आणि स्पर्धा परीक्षांची सक्षम तयारी करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) आणि भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी) तर्फे असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (एएओ), रेल्वे भरती परीक्षा (आरआरबी), एमबीए (सीईटी-कॅट), पोलिस-मिलिटरी भरती, युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन (युजीसी)/नेट/सेट, कर्मचारी निवड आयोग (एसएससी-सीजीएल), टीएआयटी (शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी) तसेच उच्च शिक्षण, संशोधन, आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती तसेच परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जीआरई (ग्रेजुएट रेकॉर्ड एक्झामिनेशन), टोफेल (टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज), आयईएलटीएस (इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टिम) तसेच फॉरेन लैंग्वेज ट्रेनिंग या परीक्षांसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली असून १० जुलै २०२६ ही अर्जाची अंतिम मुदत आहे. ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षणच नव्हे तर प्रत्येक महिन्याला निवास व भोजन व्यवस्थेसाठी विद्यावेतन तसेच प्रशिक्षणासाठी रुजू होताना एकरकमी आकस्मिक निधीदेखील देण्यात येणार आहे. नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार असून विद्यार्थ्यांची निवड चाळणी परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून अंतिम निवड करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असून राज्यभरातून अर्जांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रशिक्षणासंदर्भातील सर्व निकष, अटी, शर्ती आणि अर्ज प्रक्रियेची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात असल्याचेही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी सांगितले. महाज्योतीचे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेण्यासाठी राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) तील विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणावर विहित कालावधीत अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क करावा. विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया शेवटच्या दिवसापर्यंत न थांबवता वेळेत पूर्ण करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे अनेक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचा विश्वास मा. मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केला आहे.
त्रुटीमुक्त अर्जच पात्रतेची गुरुकिल्ली : अतुल सावे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे स्पष्ट, स्वाक्षांकित आणि स्कॅन करून अपलोड करावीत, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले.
अर्जासोबत आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण गुणपत्रक अथवा प्रमाणपत्र, पदव्युत्तर शिक्षणाशी संबंधित कागदपत्रे तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्वाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच अर्ज स्वीकृत केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील सूचना फलकामधील संबंधित परीक्षेची माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही मा. अतुल सावे यांनी केले आहे.







