spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

केळापूर तालुक्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यांना मुख्यालयाची एलर्जी ?

– नागरिकांच्या कामांचा खोळंबा, प्रशासनाचे दुर्लक्ष

पांढरकवडा :- केळापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) मुख्यालयी राहत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. शासनाच्या नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून ग्रामस्थांना सेवा देणे अपेक्षित असताना अनेक अधिकारी मुख्यालयापासून दूर राहून केवळ ठराविक वेळेस कार्यालयात हजेरी लावत असल्याची चर्चा आहे.

यामुळे दाखले, करसंबंधी कामे, विविध शासकीय योजनांचे अर्ज, जन्म-मृत्यू नोंदी, घरकुल योजना तसेच इतर विकासकामांबाबत नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेक वेळा ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) कार्यालयात अनुपस्थित असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ग्रामपंचायतींमध्ये अधिकारी आठवड्यातील मोजकेच दिवस उपस्थित राहतात. त्यामुळे विकासकामांवरही परिणाम होत असून ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार विस्कळीत होत आहे. मुख्यालयी वास्तव्यास न राहण्याच्या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

प्रशासनाने सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मुख्यालयातील वास्तव्यासंदर्भात तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच ग्रामपंचायत कार्यालय नियमित सुरू राहील याची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आता जिल्हा परिषद प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन वास्तवस्थितीची चौकशी करतील का, याकडे केळापूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles