– रनाळा परिसरात धक्कादायक घटना; आरोपी पतीला अटक
कामठी :- रनाळा–भिलगाव मार्गावरील खानवाणी लेआउट परिसरात जेवण व दारूच्या बाटलीवरून पती-पत्नीमध्ये झालेला किरकोळ वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीचा जमिनीवर डोका आपटून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेत श्यामवती उमाशंकर वटी (६०) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पती उमाशंकर थानसिंग वटी (६५) याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, उमाशंकर वटी व त्यांची पत्नी श्यामवती हे मूळचे नगरवाडा, जिल्हा बालाघाट (मध्य प्रदेश) येथील रहिवासी होते. गेल्या दोन वर्षांपासून ते रनाळा शिवारातील खानवाणी लेआउट येथे झोपडी टाकून वास्तव्य करीत होते. दोघेही बांधकाम ठेकेदार रोशन भास्कर हलमारे यांच्याकडे मजुरीचे काम करीत होते.
रविवारी दिवसभर काम केल्यानंतर दोघेही रात्री घरी परतले. श्यामवती स्वयंपाक करीत असताना उमाशंकर याने देशी दारूच्या ९० मिलीच्या बाटल्या आणल्या होत्या. त्यातील एक बाटली दिसत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या या वादाने काही वेळातच गंभीर स्वरूप धारण केले. संतप्त उमाशंकर याने पत्नी श्यामवती यांना जमिनीवर आपटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
या घटनेचा थरारक प्रकार त्यांचा दहा वर्षांचा नातू पाहत होता. त्याने आरडाओरड केल्यानंतर शेजारी नागरिक घटनास्थळी धावून आले. घटनेची माहिती मिळताच बांधकाम ठेकेदार रोशन हलमारे यांनी गंभीर जखमी श्यामवती यांना तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे व पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी उमाशंकर वटी याला अटक करण्यात आली आहे.
किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट
दारू व जेवणासारख्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचा अखेर एका महिलेच्या मृत्यूने अंत झाला. या घटनेमुळे रनाळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक वाद किती गंभीर वळण घेऊ शकतो, याची प्रचिती या घटनेतून आली आहे.
मृत श्यामवती यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा व नातवंडे असा मोठा परिवार आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे करीत आहेत.





