spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जवाहर नवोदय विद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार राजेंद्र जैन यांची तातडीची दखल

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी 

नवेगाव बांध :- गोंदिया जिल्ह्यातील एकमेव जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव बांध येथील विविध पायाभूत व भौतिक सुविधांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज खासदार राजेंद्र जैन यांना निवेदन देण्यात आले.

जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध येथे मागील सुमारे ३५ वर्षांपासून ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना निवासी व दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. मात्र, वाढती विद्यार्थी संख्या, आधुनिक शैक्षणिक गरजा आणि वाढलेला विद्युत भार लक्षात घेता विद्यालयात सध्या विविध पायाभूत सुविधांची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या संदर्भात किशोर चिंतामण तरोणे यांच्या नेतृत्वाखाली खासदार राजेंद्र जैन यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये विद्यालयात अतिरिक्त वर्गखोल्या, शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी स्टाफ क्वार्टर्स, स्टोअर रूम, पालक प्रतीक्षा कक्ष, Synthetic Track व Multi-Sports Field, तसेच सबस्टेशन ते मेस फीडर पिलर आणि स्टाफ क्वार्टर्सपर्यंत भूमिगत विद्युत केबल टाकण्याची मागणी करण्यात आली.

तसेच विद्यालयातील सध्याचा १०० KVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून २०० KVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वाढत्या विद्युत वापरामुळे ही बाब विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या आणि विद्यालयाच्या सुरळीत व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

निवेदनाची दखल घेत खासदार राजेंद्र जैन यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालयातील प्रलंबित पायाभूत सुविधांच्या कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

निवेदन देताना किशोर तरोणे यांच्यासह लोकपाल गहाणे उपस्थित होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने या सर्व मागण्यांना प्राधान्य देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Popular Articles