Monday, February 16, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आशा, अंगणवाडी आणि शालेय पोषण कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन; १२ प्रलंबित मागण्यांसाठी दिला लढा

– किमान २६ हजार वेतन आणि पेन्शनसह १२ मागण्यांसाठी पुकारला देशव्यापी संप

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :– केंद्र सरकारच्या कामगार आणि लोकविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) च्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. १२) जिल्हा परिषद चौकात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी आणि स्त्री परिचर यांच्यासह शेतकरी, विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. १२ फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय देशव्यापी संपाचा भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकार कामगार, शेतकरी आणि तरुणांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून केवळ बड्या उद्योगपतींचे हित जोपासत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी सरकार केवळ कॉर्पोरेट क्षेत्राला लाभ मिळवून देण्यात व्यस्त असल्याची टीका यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना सादर करण्यात आले.

या आंदोलनाद्वारे एकूण १२ मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यामध्ये नवीन चार कामगार संहिता रद्द करा, शासकीय योजनांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, १० वर्षे पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, आणि कामाचे आठ तास कायम ठेवा या मागण्यांचा समावेश आहे. तसेच सर्व कामगारांना किमान २६ हजार रुपये वेतन, सेवानिवृत्तीनंतर १० हजार रुपये पेन्शन, ५ लाख रुपये एकरकमी मोबदला, महिलांना सहा महिन्यांची प्रसूती रजा आणि वार्षिक १५ दिवसांच्या पगारी सुट्या लागू करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव (MSP), विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंत महागाईनुसार स्टायफंड देण्याची मागणीही आंदोलकांनी लावून धरली.

आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साठे, उषा मेश्राम, सुनंदा बसेशंकर, प्रमोद कावळे, सविता हटवार, माधुरी चोले, वर्षा चौधरी, पुष्पा ठाकरे आणि अर्चना मेश्राम यांनी केले. या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी, शेतमजूर आणि नागरिक सहभागी झाले होते. केंद्र सरकारने या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र लढा उभारण्याचा इशारा कामगार संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com