spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यात आशा सेविकांचा एल्गार! हक्काच्या लढाईसाठी १२ फेब्रुवारीला ‘कामबंद’

– तुटपुंजे मानधन आणि कामाच्या वाढत्या ताणाविरोधात आशा व गटप्रवर्तक उतरणार रस्त्यावर.

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- ग्रामीण भागातील जनतेला रात्रंदिवस आरोग्य सेवा पुरविणाऱ्या, पावसाळा असो वा कडक उन्हाळा, आरोग्याचा कणा म्हणून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आता आपल्या न्याय्य हक्कासाठी शासनाविरुद्ध संपाचे हत्यार उपसले आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) तर्फे १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद चौकात भव्य धरणे आंदोलन केले जाणार असून, यासंदर्भात प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.

रात्रंदिवस सेवा, तरीही मानधनासाठी वनवण!

ग्रामीण भागात आरोग्य दूताची भूमिका बजावणाऱ्या आशा सेविका कोणत्याही वेळेचे बंधन न पाळता २४ तास सेवा देत आहेत. लसीकरण असो, माता-बाल संगोपन असो वा शासनाच्या विविध योजना, या सर्व कामांचा भार आशा सेविकांच्या खांद्यावर आहे. मात्र, एवढी मेहनत करूनही त्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते आणि ते ही वेळेवर मिळत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आपल्या हक्काच्या पैशांसाठी वारंवार आंदोलने करूनही शासन केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहे. त्यामुळे आता ‘आर पार’ची लढाई लढण्याचा निर्धार जिल्ह्यातील १,१३० आशासेविका आणि ५४ गटप्रवर्तकांनी केला आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या?

🔹 सर्व योजना कर्मचाऱ्यांना तात्काळ शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.

🔹 महागाईचा विचार करता किमान वेतन २६ हजार रुपये लागू करावे.

🔹 वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्ती देऊन ५ लाख रुपये ग्रॅच्युइटी आणि १० हजार रुपये मासिक पेन्शन लागू करावी.

🔹 जिल्हा परिषदेमार्फत विनामोबदला करून घेतल्या जाणाऱ्या अतिरिक्त स्थानिक कामांसाठी ५ हजार रुपये विशेष भत्ता द्यावा.

१२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकरी व शेतमजूर संघटनांनीही या लढ्याला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. ११ फेब्रुवारीच्या धरणे आंदोलनात आणि १२ फेब्रुवारीच्या संपात हे सर्व घटक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

“आम्ही वारंवार विनंती करूनही सरकार आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मानधन वेळेवर मिळत नाही आणि कामाचा ताण सातत्याने वाढवला जात आहे. आता आमच्या सहनशक्तीचा अंत झाला असून, हक्क मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा सज्जड इशारा युनियनचे अध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे, महासचिव कॉ. उषा मेश्राम आणि कोषाध्यक्ष कॉ. सुनंदा बसेशंकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Popular Articles