– भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांचे प्रत्युत्तर
मुंबई :- महावितरणच्या वीजदर कपातीच्या प्रस्तावावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेली टीका पूर्णपणे निराधार व धादांत्य असत्य आहे. महावितरणने वीजदरवाढीचा कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सांगितले.
महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला मिळालेले घवघवित यश आणि काँग्रेसचे साफ अपयश यामुळे आलेल्या नैराश्यातून अतुल लोंढे यांनी ही चुकीची टीका केली आहे, असेही विश्वास पाठक म्हणाले.
विश्वास पाठक यांनी सांगितले की, अतुल लोंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे पूर्णपणे चुकीचे आणि धादांत असत्य आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वीजदर कमी करण्याचे आश्वासन दिले होते व त्यानुसार वीजदर कमी करण्याचाच प्रस्ताव महावितरणने सादर केला आहे. महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे 20 ते 40 टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याचा अतुल लोंढे यांचा दावा म्हणजे निव्वळ थाप आहे. लोंढे यांच्या सांगण्यानुसार राज्यात 16 टक्के वीजदर वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
पाठक म्हणाले की, काँग्रेस पक्षाला वास्तवाचे भान नाही, हेच त्या पक्षाच्या प्रवक्त्यांच्या निवेदनावरून दिसते. मुंबई उच्च न्यायालयाने महावितरणला फटकारून परत जनसुनावणी करून घोळ केलात तो सुधारा असा आदेश दिला आहे, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. लोंढे यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याला हे माहिती नाही की, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला आदेश दिला आहे कारण वीजदर ठरविण्याचा अधिकार हा फक्त आयोगाला आहे व महावितरणला नाही.
राज्य सरकारने या विषयात हस्तक्षेप करून पुन्हा जनसुनावणी घ्यावी, अशीही एक मजेशीर मागणी लोंढे यांनी केली आहे. वीजदर निश्चितीचा अधिकार विद्युत नियामक आयोग या स्वायत्त निमन्यायिक संस्थेला असतो व आयोगाच्या कामात राज्य सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. तसेच मा. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात पुन्हा जनसुनावणी चालू आहे, याचीही माहिती लोंढे यांच्यासारख्या नेत्याला नसावी हे आश्चर्यकारक आहे, असा टोला पाठक यांनी लगावला.
पाठक यांनी सांगितले की, वीजदरामुळे राज्यातील उद्योग अन्यत्र स्थलांतराच्या विचारात आहे, असाही असत्य दावा लोंढे यांनी केला आहे. प्रत्यक्षात विदर्भ, मराठवाडा व अन्य औद्योगिकदृष्ट्या मागास भागातील उद्योगांना वीजदरात महायुती सरकार कशी सवलत देते याची त्यांनी नोंद घेतलेली नाही. मुख्य म्हणजे मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला असून नवनवीन उद्योगांच्या उभारणीला वेग आला आहे, याचीही नोंद लोंढे यांनी घेतलेली नाही.








