– मनपाच्या आयईसी पथकाचा उपक्रम
नागपूर :- संविधान दिनाच्या निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या आयईसी पथकाद्वारे शहरभरातील विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये स्वच्छता तसेच संवैधानिक मूल्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या देखरेखीत मनपाचे आयईसी चमू कार्य करीत आहे. मनपाच्या झोन ५ अंतर्गत येणाऱ्या प्रभाग २७ मधील नंदनवन येथील ज्योतीबा हायस्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वच्छता रॅली, मानव साखळी आणि पथनाट्य आयोजित करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने यात भाग घेतला आणि स्वच्छ व निरोगी परिसराचा संदेश दिला. या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आपल्या जबाबदारीची भावना अधिक वाढण्यास मदत झाली. याच क्रमाने, झोन ८, लकडगंज येथील प्रशांत उच्च प्राथमिक विद्यालयामध्ये देखील संविधान दिनानिमित्त विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येथे विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि स्वच्छतेच्या चांगल्या सवयी याबद्दल सोप्या आणि प्रभावी पद्धतीने माहिती देण्यात आली. विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवणे. नागरिकांची कर्तव्ये समजावून सांगणे. संविधानातील मूल्यांना जीवनात आत्मसात करण्यासाठी प्रेरित करणे याकरिता रॅली आणि नुक्कड नाटकांच्या माध्यमातून स्वच्छ पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि सक्रिय नागरिकत्व यासंबंधीचे संदेश प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. नागपूर महानगरपालिका शहर स्वच्छ, सुंदर आणि जागरूक बनवण्यासाठी असे जनजागृती अभियान सातत्याने आयोजित करत असते.




