हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘व्हीव्हीपॅट’ (VVPAT) मशीनचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले असून, व्हीव्हीपॅटशिवाय निवडणुका घेणे ही लोकशाहीची फसवणूक असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला नाही. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात स्पष्ट म्हटले आहे की, मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट अत्यावश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन करून निवडणुका घेणे म्हणजे मतदारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे, असे संघटनांचे म्हणणे आहे.
या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन मुक्ती पार्टीतर्फे तीव्र आंदोलनाचे टप्पे जाहीर करण्यात आले आहेत. यात तहसीलवर धरणे आंदोलनासह ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.
निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष सुभाष भिवगडे, कपिल रंगारी, पियुष गोस्वामी, इलेक्ट्रिक मॅन अभय डी. रंगारी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीवर जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट अनिवार्य करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.




