हंसराज,भंडारा :- केंद्र सरकारच्या जनविरोधी नीतीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून, वाढती महागाई, बेरोजगारी आणि संविधानविरोधी निर्णयांविरोधात बहुजन मुक्ती पार्टीने राष्ट्रव्यापी एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चूल पेटवा’ आंदोलन करून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनाला जनतेचा उत्स्फूर्त आणि आक्रमक प्रतिसाद लाभला.
देशातील ३६ राज्यांतील ६५० जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे आंदोलन करण्यात आले. भंडारा येथे आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चूल पेटवून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी “गॅस पेट्रोल दे ना सके जो, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
बहुजन मुक्ती पार्टीने आपल्या आंदोलनाद्वारे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर बोट ठेवले आहे. यामध्ये प्रामुख्याने गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, स्मार्ट मीटरच्या नावाखाली अवाढव्य वाढीव वीज बिले, बेरोजगारीची समस्या, तसेच नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षांमधील गोंधळ यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. “जनतेची, जनतेद्वारे, जनतेसाठी निर्मित” असलेल्या आणि स्टॅम्प पेपरवर आपला निवडणूक जाहीरनामा घोषित करणाऱ्या बहुजन मुक्ती पार्टीने या सर्व प्रश्नांवर केंद्र सरकारला धारेवर धरले.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुभाष भिवगडे यांनी इशारा दिला की, जर केंद्र सरकारने आपल्या धोरणांत सुधारणा केली नाही आणि जनतेच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ३१ मे रोजी संपूर्ण देशभर राष्ट्रव्यापी ‘दे धक्का’ जनआंदोलन छेडले जाईल.
कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती: या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुभाष भिवगडे, रविदास लोखंडे, कपिल रंगारी, शरयू डहाट, मोहित वैद्य, बामणेसर, संजय भोले, मुकुल सूर्यवंशी, ‘इलेक्ट्रिक मॅन’ अभय डी. रंगारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.