spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा; ७.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा कारधा :- राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर धारगाव शिवारात कारधा पोलिसांनी मोठी कारवाई करत ११ गोवंशांची सुटका केली आहे. या कारवाईत ७ लाख रुपयांचे वाहन आणि ५५ हजार रुपयांची जनावरे, असा एकूण ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी चालक वाहन सोडून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला (स्थागुशा) गुप्त माहिती मिळाली होती की, एका पिकअप वाहनातून जनावरांची अवैध वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पोहवा. कठाणे आणि त्यांच्या पथकाने मौजा धारगाव शिवार येथील गोवा ढाब्यासमोर सापळा रचला. यावेळी महिंद्रा बुलेरो पिकअप वाहन (क्र. एम.एच.४९/बी.झेड ४२६८) संशयास्पदरीत्या येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पळ काढला.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यात ११ गोवंश जातीची जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबलेली आढळली. नियमानुसार प्रत्येक जनावरासाठी २ बाय २ मीटर जागा असणे बंधनकारक असताना, या वाहनात पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. जनावरांना आखूड दोरीने बांधून, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांची वाहतूक केली जात होती.

या प्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध कारधा पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. ४८८/२०२६, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (घ) (ड) (व) (ज) (झ) सहकलम ५, ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. कठाणे (स्थागुशा) व त्यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास कारधा पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.