spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोर्शी तालुक्यातील बँकांचा हवामानावर आधारित संत्रा फळपीक विमा काढण्यास नकार ! 

– हजारो शेतकरी फळ पीक विमा व गारपीट विम्यापासून वंचित राहण्याची भीती ! 

– बँकांवर कारवाई करण्याची रुपेश वाळके यांची मागणी !

– राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुका संत्रा उत्पादनासाठी राज्यातील महत्त्वाचा पट्टा असून हजारो शेतकऱ्यांची उपजीविका संत्रा पिकावर अवलंबून आहे. आधीच दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि उत्पादन खर्चाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना फळ पीक विमा योजनेतही अडथळे निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

शेतकरी आपल्या शेतीची कामे सोडून विमा भरण्यासाठी बँकांमध्ये जात आहेत. मात्र काही बँकांमध्ये विमा अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. शासनाने शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी योजना उपलब्ध करून दिलेली असताना बँकांच्या स्तरावरच अडथळे निर्माण होत असतील, तर प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोर्शी तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधींना निवेदन सादर केले आहे.

बँकांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा!

मोर्शी तालुक्यातील सर्व बँकांना पात्र शेतकऱ्यांचे फळ पीक विमा व गारपीट विमा अर्ज स्वीकारण्याचे तातडीने निर्देश द्यावेत, विमा अर्ज नाकारणाऱ्या बँकांची चौकशी करावी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, प्रत्येक बँकेत विमा नोंदणीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावा आणि एकही पात्र शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी रुपेश वाळके यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक!

शेतकऱ्यांच्या भरवशावर चालणाऱ्या बँकांनीच शेतकऱ्यांना विमा संरक्षणापासून वंचित ठेवणे ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी बँकांच्या दारात हेलपाटे मारावे लागणे दुर्दैवी आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधित बँकांना स्पष्ट निर्देश द्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संबंधित बँकांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रुपेश वाळके यांनी दिला आहे.

हजारो संत्रा उत्पादक शेतकरी गारपीट विमा संरक्षणापासून वंचित राहण्याची भीती !

संत्रा फळपिकाचा गारपीट विमा सीएससी केंद्रांवरून काढण्याची सुविधा नसून तो केवळ बँकांमार्फतच काढावा लागतो. मात्र, बँकांकडूनच गारपीट विमा काढण्यास नकार दिला जात असल्याने हजारो संत्रा उत्पादक शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यात गारपीट झाल्यास शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व बँकांना गारपीट विमा काढण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

Popular Articles