– कलमना परिसरात एस्कॉर्ट स्क्वॉडकडून छापा; घरातून गुटखा आणि सुगंधित पानमसाला हस्तगत
नागपूर :- शहर पोलिसांच्या एस्कॉर्ट स्क्वॉडने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई करत कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आरोपीला अटक केली. लखन चतरो छाडी (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या घरातून २ लाख २३ हजार ५०३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाला जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ४.३० वाजता गस्तीवर असताना पोलिसांना माहिती मिळाली की, जुना कामठी रोडवरील न्यू ओम साईनगर परिसरातील रहिवासी लखन याने विक्रीच्या उद्देशाने घरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून ठेवला आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकून झडती घेतली. यावेळी बेडरूम आणि स्टोअर रूममध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधित पानमसाला आढळून आला. पोलिसांनी हा माल जप्त करून आरोपीला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.





